♦️ अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे गौरोद्गार ‘सिंदूर ऑपरेशन’ देखाव्याचे उद्घाटन

हिवरे बाजार : प्रतिनिधी सार्वजनिक सण-उत्सव शांततेत कसे साजरे करावेत आणि लोकसहभाग कसा वाढवावा, हे हिवरे बाजार गावाकडून शिकण्यासारखे आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले. हिवरे बाजार येथील ‘एक गाव, एक गणपती’ या उपक्रमाच्या तिसाव्या वर्षानिमित्त श्री. घार्गे यांच्या हस्ते श्री गणेश आरती तसेच 'सिंदूर ऑपरेशन' देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी घार्गे म्हणाले, “सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने सादर केलेला सिंदूर ऑपरेशन देखावा ही अतिशय उत्कृष्ट संकल्पना आहे. हिवरे बाजार येथे मागील ३० वर्षांपासून पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना अखंडितपणे सुरू आहे आणि पुढेही राहील. या उपक्रमाचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा.” ते पुढे म्हणाले की, “सार्वजनिक सण-उत्सव शांततेत पार पाडावेत म्हणून पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असते, मात्र त्यात नेहमी यश मिळतेच असे नाही. अनेक छोट्या गावांमध्ये गणपती मंडळांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, काही ठिकाणी वाईट चालीरीतींना थारा दिला जातो. त्यामुळे व्यसनाधीनता व गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे. यावर वेळीच पायबंद घालण्याची गरज आहे.” या कार्यक्रमाला राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन महाराज स्वामी यांचे परमशिष्य महान तपस्वी बालब्रह्मचारी महंत १०८ स्वामी सोमेश्वरानंद गिरीजी महाराज (सुसंस्कार संस्था, शिवटेकडी ता. मालेगाव, जि. नाशिक) उपस्थित होते. ते म्हणाले, “हिवरे बाजार गावात एकीचे मोठे बळ आहे. प्रत्येकाने कष्टातून गावाचा विकास साधला आहे.” या वेळी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, व्हा. चेअरमन रामभाऊ चत्तर, हरिभाऊ ठाणगे (सर), सखाराम पादीर (सर), रोहिदास पादीर, राजेंद्र वनाजी ठाणगे, अभय ठाणगे, तसेच तरुण मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.