चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
चंद्रपूर : कोरपना तहसील अंतर्गत
येणाऱ्या सांगोडा ग्रामपंचायतीत पांदन रस्ता, नालीवरील रपटा, अंगणवाडीला कपाट, टेबल, खुर्ची, खेळणी देने, जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सात अपंगांना पैसे वाटप, वैयक्तिक शौचालयाचा लाभअशा कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची त्वरित चौकशी करून यात सहभागी व्यक्तिंवर कठोर कारवाई करावी, अन्यथा १५ सप्टेंबरपासून कोरपना पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सांगोडा ग्रामस्थांनी पत्रपरीषदेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाला दिला आहे. ग्रामस्थ शुभम ढवस आणि इतर ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सांगोडा ग्रामपंचायतीत अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार होत आहे.
गावातील नागरिकांनी भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि त्याबद्दल तक्रार केली परंतु सरपंच आणि सचिवांच्या लाचखोरीमुळे भ्रष्टाचाराचे प्रकरण सुटत नाही आहे.
तत्कालिन सरपंच सचिन बोंडे हे २०१५ ते २०२० या काळात ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम करत असताना २० एप्रिल २०२२ रोजी ४ लाख रुपये आणि ५ जून २०२२ रोजी ४.१० लाख रुपये पांदन रस्त्यावर खर्च केले आणि त्याचे बील सुध्दा उचलल्याचे ग्रापं च्या कैश बुकावर नमुद आहे. परंतु या कामात फक्त माती टाकून रस्ता बांधण्यात आला. त्यामुळे रस्त्याची पातळी कमकुवत झाली आहे. १९ सप्टेंबर २०२२ रोजी कवडू पिंपळकर यांच्या घराजवळील नालीवर रपटा बांधण्यात आला. परंतु २०२३ मध्ये त्याच रपटयाची पुनर्बाधणी करून त्याचे बिल उचलल्या गेले. परंतु, त्या वर्षात असे काम झाले नसल्याचे सांगण्यात आले. मग ग्रामपंचायतीच्या कॅश बुकमध्ये बिल वाढवण्याची नोंद कशी काय? हा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. २०२२ मध्ये ग्रामपंचायतीने अंगणवाडीसाठी ५० हजार रुपये किमतीचे गोदरेज कपाट, टेबल खुर्ची आणि खेळणी दिल्याची नोंद ग्रामपंचायतीच्या कॅश बुकमध्ये आहे. परंतु ग्रामसभेत, विस्तार अधिकारी आणि सर्व ग्रामस्थांसमोर, अंगणवाडी सेविकेला याबद्दल विचारणा केली असता संबंधित वस्तू मिळाल्या नसल्याचे समोर आले.
सांगोडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना २० हजार किमतीचे शैक्षणिक साहित्य देण्यात आल्याची नोंद पत्रपरीषदेत कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
ग्रामपंचायतीच्या कॅश बुकमध्ये आहे. परंतु जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापनाने २०२१ ते २०२४ या कालावधीत ग्रामपंचायतीने कोणताही आर्थिक किंवा भौतिक लाभ दिला नाही असे सांगितले. १० मार्च २०२२ रोजी ग्रामपंचायतीच्या कॅश बुकमध्ये ७ अपंगांना प्रत्येकी ३ हजार रुपयांचा निधी वाटप केला असल्याचे कैश बुकात नोंद आहे. परंतु अपंगांनी असे कोणतेही निधी मिळालेले नसल्याचे सांगीतले आहे.
सरपंचाने स्वतःच्या घरात एक शौचालय असूनही, दुसऱ्या शौचालयाचा लाभ घेऊन सरकारची फसवणूक केली आहे. १० मे २०२३ रोजी अमोल कळसकर यांच्या नावाचे ६१,००० रुपयांचे बिल कॅश बुकमध्ये नोंदवले आहे, जुलै २०२२ मध्ये अंगणवाडी दुरुस्तीचे साहित्य खरेदी करण्यासाठी २९,००० रुपये देण्यात आल्याची नोंद आहे, परंतु अमोल कळसकर यांना ते पैसे मिळाले नसल्याचे सांगीतले. त्यामुळे शुभम ढवस आणि ग्रामस्थांनी पत्रपरिषदेत माजी सरपंच सचिन बोंडे यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
संजना सचिन बोंडे २०२१ पासून आजपर्यंत सरपंच आहेत. त्यांचे पती गावपातळीवर कोणत्याही पदावर किंवा सदस्य नसतानाही गावाचे काम सांभाळत आहेत. इतकेच नाही तर ते ग्रामसेवकांना आदेशही देत आहेत, त्यामुळे संजना सचिन बोंडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची आणि ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेमार्फत जिल्हा प्रशासनाकडे केली आहे, अन्यथा त्यांनी कोरपना पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पत्रपरिषदेत विठोबा दिनकर बोंडे, शुभम संजय ढवस, रवींद्र भाऊराव देवलकर, जयभारत धोटे, आकाश रागीट, निशांत पिंपळकर, गौरव पाचभाई आदी उपस्थित होते.