• सहस्त्रकुंड बंधाऱ्यातील हत्येचा छडा; मारेकऱ्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी..!

उमरखेड प्रतिनिधी | दि. ६ फेब्रुवारी २०२६

यवतमाळ: उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात मृतदेह फेकून दिल्याच्या घटनेचा पोलिसांनी अत्यंत शिताफीने उलगडा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलानेच मारोती डुकरे यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तपासाचा धागा: ५० किमीचा प्रवास आणि एक ‘लोगो’

मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, मृतकाच्या कपड्यावर असलेल्या ‘सीटी मेन्स वेअर’ या एका छोट्या लोगोने तपासाला दिशा दिली. पोलिसांनी हा लोगो असलेल्या दुकानांचा शोध घेत ५० किमी अंतरावरील गावे पिंजून काढली. अखेर ४ फेब्रुवारी रोजी मृताची ओळख मारोती गंगाराम डुकरे (वय ६०, रा. जलदरा, ता. किनवट) अशी पटली. ओळख पटताच संशयाची सुई कुटुंबाकडे वळली आणि सत्य समोर आले.

हत्येचा थरार: लाकडी पाटाने केला वार

आरोपी मुलगा प्रदीप आणि पत्नी पार्वताबाई यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटनेच्या रात्री घरात नेहमी होणाऱ्या वादाला कंटाळून रागाच्या भरात प्रदीपने वडिलांच्या डोक्यावर लाकडी पाटा मारला. वडील खाली कोसळताच त्यांच्या गळ्यावर पाय देऊन त्यांना जागीच ठार केले. संशय येऊ नये म्हणून मृतदेह एका गाठोड्यात बांधला आणि रात्री २:३० च्या सुमारास दुचाकीवरून नेऊन मुरली बंधाऱ्यात फेकून दिला.

    न्यायालयीन कारवाई

    गुरुवारी ५ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना ११ फेब्रुवारीपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    पोलीस पथकाची कामगिरीउपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बिटरगावचे ठाणेदार पांडुरंग शिंदे आणि त्यांच्या पथकाने या अंधाऱ्या खुनाचा छडा लावून आरोपींना गजाआड केले आहे. या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.


    प्रतिनिधी ताहेर मिर्झा, उमरखेड, यवतमाळ.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *