यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देत सण उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापिका रंजना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दिवाळी कार्यक्रम पार पडला. यावेळी दीपाली धांडे, राजश्री लोखंडे आणि गौरी भिरूड उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
गाय-वासराची पूजा करून वसुबारस, तसेच धन्वंतरी, लक्ष्मी आणि गणेशपूजन करून दिवाळी साजरी करण्यात आली. सौ. संस्कृती फेगडे यांनी दिवाळी आणि भाऊबीजेचे महत्त्व सांगितले. दीपाली धांडे यांनी फटाक्यांचा वापर टाळून पर्यावरणपूरक आणि सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.
मोठ्या दुकानांऐवजी रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या गरीब विक्रेत्यांकडून खरेदी करून त्यांच्या संसाराला हातभार लावण्याचा संदेश फलकलेखनातून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे आकर्षक आकाशकंदील तयार केले. भाऊबीजेनिमित्त विद्यार्थ्यांनी एकमेकांना ओवाळले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पाटील यांनी केले, तर सुरेखा महाजन यांनी आभार मानले. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
