गिरणा धरणात ९७ टक्के जलसाठा उपलब्ध असतानाही सिंचनासाठी कालव्यातून पाणी सोडले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एरंडोल, भडगावसह जिल्ह्यातील १५० गावांच्या शेतकऱ्यांनी आता तीन आवर्तनांसाठी प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील नुकसानानंतर आता रब्बी हंगामासाठी चिंतेत आहेत. गिरणा धरणात ९७ टक्के उपयुक्त जलसाठा असतानाही कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
या मागणीसाठी २ नोव्हेंबर २०२६ रोजी एरंडोल, भडगावसह जिल्ह्यातील सुमारे १५० गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी तातडीने तीन आवर्तने सोडावीत, अशी मागणी करण्यात आली.
कालव्याद्वारे पाणी सोडल्यास पाटस्थळ भागातील विहिरी आणि कूपनलिकांची जलपातळी वाढून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच ज्वारी, मका आणि बाजरी यांसारखी रब्बी पिके घेता येतील. दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मार्गी लागेल आणि ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर थांबून रोजगार उपलब्ध होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनाद्वारे तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. गिरणा कालव्यावर अवलंबून असलेल्या सुमारे १५० गावांसाठी तातडीने तीन आवर्तने सोडावीत. या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाने तातडीने कालवा सल्लागार समितीची बैठक बोलवावी. तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकरी आणि ग्रामस्थ मोर्चा काढून तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन सादर करताना जलतज्ज्ञ ॲड. विश्वासराव भोसले (पिंपरखेड), ॲड. जयेश पिलोरे (कासोदा), डॉ. अमृत पाटील (कनाशी), आबासाहेब राजपूत (अंतुर्ली), सुनील पाटील (उमरे), उमेश पाटील (वनकोठे), किशोर महाले (निपाणे), सचिन पाटील, देविदास पाटील (अंतुर्ली), रावसाहेब पाटील (आडगाव), योगेश पाटील (पिंपरखेड), सुभाष भिका देशमुख (कडोली), प्रकाश नानाजी कोळी (गिरड) आणि विजय पाटील (गोंडगाव) यांच्यासह १५० हून अधिक गावांतील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुबलक जलसाठा असूनही सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याच्या या प्रश्नावर आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
