दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर यावलकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावल-पुणे बससेवा सुरू करण्यासाठी नगरसेविका वर्षा चोपडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अवघ्या ४८ तासांत यश आले असून जादा बसेससह रातराणी बससेवाही सुरू करण्यात आली आहे.
यावलकरांची दिवाळीतील प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) च्या गटनेत्या नगरसेविका वर्षा निरज चोपडे यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी यावल आगार व्यवस्थापक आणि एसटी महामंडळाला लेखी निवेदन दिले होते.
पुण्यात नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी गेलेल्या यावलकरांसाठी जादा बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली होती. विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारी गर्दी व गैरसोयही त्यांनी निदर्शनास आणून दिली.
या मागणीची एसटी महामंडळाने तातडीने दखल घेत ३ नोव्हेंबरपासून यावल-पुणे आणि पुणे-यावल मार्गावर जादा बसेस तसेच रातराणी बस सेवा सुरू केली.
या मागणीला भाजप गटनेत्या नंदाताई महाजन, सविताताई ननवरे, कल्पना वाणी, शुभांगी येवले, उमेश भेगडे, बाळू फेगडे, कादिर खान, इरफान लाल आणि रुबाब तडवी यांच्यासह महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता.
बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून, नगरसेविका वर्षा चोपडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
