यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. विद्यमान सभापती आणि उपसभापती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आता नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सभापती आणि उपसभापती पदासाठी काही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती उज्जैनसिंग भाऊलाल राजपूत आणि उपसभापती दीपक दिनकर चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी नवीन निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीचे बहुमत आहे. महायुतीमध्ये ठरल्याप्रमाणे सर्वांना सभापतीपदाचा सन्मान मिळण्याची समान संधी मिळावी, या दृष्टिकोनातून विद्यमान सभापती आणि उपसभापतींनी राजीनामे दिल्याचे समजते.
दिनांक ४ नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या सभागृहात नवीन सभापती आणि उपसभापतींची निवड होणार आहे. महायुतीचे १९ संचालकांचे बहुमत असलेल्या या बाजार समितीत सभापतीपदासाठी भारतीय जनता पक्षाचे संचालक उमेश प्रभाकर पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
तर उपसभापतीपदासाठी भाजपचे संचालक पंकज दिनकर चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या पदांसाठी सागर राजेंद्र महाजन आणि सौ. कांचन ताराचंद फालक यांच्या नावांचीही चर्चा होत आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी आमदार अमोलभाऊ जावळे, पक्षातील पदाधिकारी आणि संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सभापती आणि उपसभापती पदाच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या नेतृत्वाची जबाबदारी नेमकी कोणाकडे जाणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
