अहिल्यानगर: महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सय्यद जुनैद यांची नियुक्ती नियमांचे उल्लंघन करून झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी केला आहे. शेख यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, ही नियुक्ती त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे.
शेख यांनी दिलेल्या निवेदनानुसार, वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम २३ नुसार वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी राज्य शासनाच्या उपसचिव दर्जाचा मुस्लिम अधिकारी असणे आवश्यक आहे. जर असा अधिकारी उपलब्ध नसेल, तर समकक्ष दर्जाच्या दुसऱ्या मुस्लिम अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली जाऊ शकते.
या नियमांचे उल्लंघन करून अल्पसंख्याक विकास मंत्रालयातील कक्ष अधिकारी असलेल्या सय्यद जुनैद यांना ६ जुलै २०२२ पासून दोन वेळा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
शेख यांनी पुढे म्हटले आहे की, केंद्र शासनाने ‘द मुस्लिम वक्फ अधिनियम २०२५’ मध्ये सुधारणा केली असून, कलम २३ नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर राज्य शासनाच्या सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. असे असतानाही, सय्यद जुनैद यांची नियुक्ती करून या सुधारित नियमांचेही उल्लंघन झाले आहे.
निवेदनात सय्यद जुनैद यांच्या कार्यकाळात अनेक वादग्रस्त निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये पुणे-मुंबई महामार्गावरील बाणेर येथे ९०० कोटी रुपयांचा भूखंड एका खासगी बांधकाम व्यावसायिकाला फक्त ९.५ कोटी रुपयांना विकण्यास परवानगी दिल्याचे प्रकरण विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
शेख यांनी सय्यद जुनैद यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व जमीन व्यवहारांची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांची नियुक्ती रद्द करून या पदावर पूर्णवेळ आणि पात्र अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.