- रामनगर, उत्तराखंड येथे सन्मान सोहळा; हिवरे बाजारच्या कामाचे कौतुक

अहिल्यानगर: महाराष्ट्रातील आदर्श गाव हिवरे बाजारचे शिल्पकार पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांना उत्तराखंडमधील रामनगर येथे ‘आज का कर्मवीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अखिल भारतीय अखंड राजपुताना राष्ट्रीय सेवा संघातर्फे आयोजित राष्ट्रीय बिझनेस समिट आणि सन्मान सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यात अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह, बिहारचे पर्यटन मंत्री डॉ. राजेशकुमार सिंह, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महाराणा प्रताप यांचे वंशज महाराणा डॉ. लक्षराज सिंह मेवाड, कर्मवीर पुरस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. आर.पी. सिंह आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा समावेश होता.
या पुरस्काराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या प्रेरणेतून झाली आहे. दरवर्षी राष्ट्र उभारणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. यावर्षी देशभरातील अनेक नामवंत व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला, त्यात महाराष्ट्रातून डॉ. पोपटराव पवार, तसेच पद्मश्री कवलसिंह चौहान (हरियाणा), पद्मश्री भीमसिंग (बिहार) आदींचा समावेश होता.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमधील जल व मृदसंधारण, पाण्याचा ताळेबंद आणि ग्रामविकासातील लोकसहभागाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितलेल्या ग्रामविकासाच्या ‘सप्तसूत्री’ने प्रभावित होऊन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी लवकरच आपला अभ्यास गट हिवरे बाजारला पाठवण्याची घोषणा केली. यामुळे हिवरे बाजारच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.