खामगाव, बुलढाणा: नवरात्रीच्या उत्साहात न्हाऊन निघालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक धक्कादायक आणि तितकीच थरारक घटना घडली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर त्याच चाकूने स्वतःला भोसकून आत्महत्या केली. सजनपुरी परिसरातील एका हॉटेलमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
मंगळवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. शहरातील सजनपुरी भागातील ‘जुगनू’ हॉटेलमध्ये साहिल उर्फ सोनू राजपूत (वय २२, रा. साखरखेर्डा, सिंदखेड राजा) आणि ऋतुजा पद्माकर खरात (रा. शिंदी, सिंदखेड राजा) हे दोघे थांबले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, साहिलने रागाच्या भरात ऋतुजावर चाकूने वार केले. या हल्ल्यात ऋतुजाचा जागीच मृत्यू झाला.
प्रेयसीची हत्या केल्यानंतर साहिलला कदाचित आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला असावा. त्याने त्याच चाकूने स्वतःच्या शरीरावर वार करून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हॉटेलच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोघांचे मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली.
पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणी मृतक साहिल उर्फ सोनू राजपूत याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुढील तपास करत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून सोनू आणि ऋतुजा यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. ते दोघेही मूळचे सिंदखेड राजा तालुक्यातील असून, खामगावात राहत होते आणि या हॉटेलमध्ये ते वारंवार येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या दुर्दैवी घटनेने शहरात खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा ‘जुगनू’ हॉटेल चर्चेत आले आहे.
प्रतिनिधी संजय दांडगे,
एनटीव्ही न्यूज मराठी, खामगाव, बुलढाणा.