जाफराबाद (जालना) – जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस.डी. एरंडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात सेवा गौरव सोहळा संपन्न झाला. डॉ. एरंडे यांनी महाविद्यालयात तब्बल ३३ वर्षांचा प्रदीर्घ सेवाकाळ पूर्ण केला आहे.
माजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाचे योगदान
हा गौरव सोहळा सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. दादासाहेब म्हस्के यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख होते. विचारमंचावर उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे, उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपप्राचार्य प्रो. सुनील मेढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर सेवानिवृत्त प्रा. डॉ. एस.डी. एरंडे यांचा यथोचित सत्कार मा. दादासाहेब म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी डॉ. एरंडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
सेवाकार्याची गौरवगाथा
संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब म्हस्के यांनी आपल्या गौरवउद्गारात सांगितले की, डॉ. एस.डी. एरंडे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये ३३ वर्षे सेवाकार्यकाळ पूर्ण करून जाफराबाद तालुका तसेच परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. एरंडे यांनी आपल्या ३३ वर्षांच्या सेवाकाळात आलेल्या अनुभवांचे कथन केले आणि मा. दादासाहेब यांनी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी डॉ. एरंडे यांच्यासोबतचे शैक्षणिक आणि व्यावसायिक संबंध स्पष्ट करत त्यांना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याबद्दल भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.डी. पैठणे यांनी केले, तर प्रा. एस.टी. साळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्यास कनिष्ठ, वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि डॉ. एरंडे यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रतिनिधी राहुल गवई,
एनटीव्ही न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.