देगलूर/प्रतिनिधी

पत्रकारिता आणि समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत जनतेच्या समस्यांना आवाज देणारे देगलूरचे कृतिशील पत्रकार शेख असलम यांना प्रतिष्ठेचा ‘प्रेरणादीप उत्कृष्ट राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार–२०२५’ प्रदान करण्यात आला आहे. मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आणि मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समारंभात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती शिकारे यांच्या हस्ते त्यांना यशाची सत्कार करून सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देण्यात आले. या सन्मानानंतर त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, देगलूरसह जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गोरगरीब परिस्थितीतून आलेले आणि जिद्दीच्या बळावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे शेख असलम हे निर्भीड, प्रामाणिक आणि लोकाभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी दैनिक साहित्य सम्राट, कुलस्वामिनी संदेश, दैनिक भास्कर आणि तरुण भारत या नामांकित वृत्तपत्रांत उल्लेखनीय पत्रकारिता केली असून सध्या ते दैनिक ‘एकमत’ मध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर लोकवाणी वार्ता या यूट्यूब चॅनलचे प्रमुख म्हणून ते स्थानिक तसेच सामाजिक विषयांवर सक्रीय पद्धतीने काम करत आहेत. त्यांची लेखणी सदैव समाजातील दुर्बळ, उपेक्षित आणि वंचित घटकांच्या न्यायासाठी झटणारी ठरली आहे.


पत्रकारितेबरोबरच शेख असलम हे समाजसेवेच्या क्षेत्रातही तितकेच सक्रिय आहेत. पत्रकार संरक्षण समिती (महाराष्ट्र) चे देगलूर तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर काम करताना महत्वपूर्ण योगदान दिले आहे. याच बरोबर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहिमा, अन्नदान, रुग्णालय मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, कोरोना काळातील सेवाकार्य आणि पत्रकार व पोलिसांचा सन्मान कार्यक्रमांचे आयोजन करून समाजातील एकोपा आणि सेवाभाव जपला आहे. त्यांच्या या सामाजिक आणि पत्रकारितेतील कार्याबद्दल पुरस्कार निवड समितीने गौरवोद्गार काढताना म्हटले आहे की, “आपण आपल्या कार्यक्षेत्रातील जबाबदारी निष्ठेने आणि सेवाभावाने पार पाडत आहात. आपल्या लेखणीतून समाजातील संवेदनशील विषयांना न्याय मिळतो आणि सामाजिक एकोपा दृढ होतो.” हा सन्मान म्हणजे शेख असलम यांच्या जिद्दी, परिश्रम आणि निष्ठेचा गौरव असून देगलूरच्या पत्रकारितेचा अभिमान वाढवणारा ठरला आहे. त्यांच्या कार्याबद्दल समाजातील विविध मान्यवर, सहकारी पत्रकार आणि नागरिकांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “आपली लेखणी म्हणजे समाजासाठी प्रेरणेचा दीप आहे,” अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला आहे..