गंगापूर प्रतिनिधी, १३ ऑक्टोबर २०२५
गंगापूर: राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूल, रायपूर येथे नुकत्याच आयोजित गंगापूर तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत सेंट मेरी विद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
या स्पर्धेत सेंट मेरी विद्यालयाच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन केले. लांबउडी प्रकारात प्रथमेश भाऊसाहेब पवार आणि प्रणव लक्ष्मण गुंड यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत वेदांत गणेश जाधव याने तृतीय क्रमांक मिळवला.
याशिवाय, ४x४०० मीटर रीले स्पर्धेत सेंट मेरी विद्यालयाच्या संघाने आपली ताकद दाखवली. यश विजय माघाडे, राज बाजीराव सोनवणे, चैतन्य रवींद्र ढगे आणि यश प्रेमचंद पारखे या चौघांनी उत्तम संघभावना आणि जोशपूर्ण खेळ सादर करत तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री. पी. डी. त्रिभुवन सर, मार्गदर्शक श्री. अतुल दुशिंग सर, श्री. बाबासाहेब पारखे आणि विद्यालयाचे माजी खेळाडू वैभव तगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचे यशस्वी संयोजन श्री. अर्जुन पारखे सर यांनी केले.
संस्थेचे सचिव रे. फा. संजय रुपेकर, विद्यालयाचे संचालक फादर मायकेल अँथोनी, प्राचार्य श्री. एस. बी. बनसोडे, उपप्राचार्य श्री. एस. यु. निकम, पर्यवेक्षक श्री. अजय थोरात, तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. एस. के. जाधव यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व विजयी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सेंट मेरी विद्यालयाचे खेळाडू आता जिल्हास्तरावर नवी कामगिरी घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
प्रतिनिधी अमोल पारखे,
एनटीव्ही न्यूज मराठी, गंगापूर, छ. संभाजीनगर.