गंगापूर प्रतिनिधी, दि. १४ ऑक्टोबर
गंगापूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावर तांबे वॉशिंग सेंटरजवळ सोमवारी (दि. १३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एक जण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टरशिवाय उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला मोटारसायकलची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहेगाव येथील रहिवासी प्रणव पारखे आणि अमोल कडू हे दोघे व्ही-सेव्हन कंपनीत कामासाठी मोटारसायकलवरून जात होते. अंधारात रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या, पण रिफ्लेक्टर (प्रतिबिंबित पट्टी) नसलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला त्यांच्या मोटारसायकलची जोरदार धडक बसली. या अपघातात प्रणव पारखे हा गंभीर जखमी झाला असून, अमोल कडू किरकोळ जखमी झाला आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत दोन्ही जखमींना गंगापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. पवन मुंदडा आणि डॉ. विशाल सूर्यवंशी यांनी दोघांवर प्राथमिक उपचार केले. मात्र, प्रणव पारखे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नजीकच्या काळात ऊस हंगाम सुरू होत असल्याने वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रॅक्टर-ट्रॉलींना रात्रीच्या वेळी त्यांची दृश्यमानता (Visibility) वाढवण्यासाठी रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक करावे, असे आदेश प्रशासनाने त्वरित द्यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
प्रतिनिधी अमोल पारखे,
एनटीव्ही न्यूज मराठी, गंगापुर, छ. संभाजीनगर.