नागपूर: जिवापाड प्रयत्न करून दिवस-रात्र एक करत कोमल गुणवंत ढवळे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तुंग यश मिळवत राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कठोर परिश्रमाच्या बळावर तिने राज्यात सातवा क्रमांक मिळवून नागपूर जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथील मूळनिवासी आणि सध्या गोंधणी (नागपूर) येथे वास्तव्य असलेल्या कोमलने आपल्या चौथ्या प्रयत्नात हे लक्षणीय यश संपादन केले आहे. तिने उत्कृष्ट गुणांसह मुलींच्या गटात राज्यात सातवा क्रमांक तर ओबीसी प्रवर्गात चौथा क्रमांक पटकावला आहे. एकूण विद्यार्थ्यांमध्ये तिला ११९ वा रॅंक मिळाला आहे.

कोमलचे वडील गुणवंत ढवळे हे विविध कंपनीतून कार्यरत असून आई ललिता गृहिणी आहेत. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे इंजिनिअरिंगऐवजी तिने बी.एस.सी. करण्याचा निर्णय घेतला. पदवी शिक्षणादरम्यानच तिने एमपीएससीची तयारी करण्याचे ध्येय निश्चित केले.

गणित विषयात एम.एस.सी. पदवी मिळवल्यानंतर कोमलने २०२० पासून पुण्यातून अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली, तर तिसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षा पार केली मात्र मुलाखतीत यश आले नाही. या अपयशांनी खचून न जाता, अखेर चौथ्या प्रयत्नात कोमलने सर्व अडथळे पार करत देदीप्यमान यश संपादन केले.

कोमलने यशाचे श्रेय देताना सांगितले की, “सातत्यपूर्ण परिश्रम आणि स्वतःच्या चुका सुधारत राहणे, हेच यशाचे खरे रहस्य आहे.”

कोमलच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिनिधी मंगेश उराडे,

एनटीव्ही न्यूज़ मराठी, नागपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *