BHANDARA | भंडारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक या पदावर नियुक्ती करण्याकरिता भंडाऱ्याचे विजय यावलकर आणि त्यांच्यासह असलेल्या रॅकेटमधील अन्य यांनी प्रति उमेदवार 15 लाख रुपये घेतले. अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील तरुणांकडून ही रक्कम घेतल्यानंतर त्याला आरोग्य विभागात नियुक्त करण्यात आल्याचे बनावट जॉइनिंग लेटर देण्यात आले. मात्र, तो तरुण जेव्हा भंडाऱ्यात नोकरीवर रुजू होण्यास आला तेव्हा त्याची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. यामुळे त्यांनी अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यात या रॅकेट विरोधात तक्रार दाखल केली होती. या अनुषंगानं दर्यापूर पोलिसांचं एक पथक या आरोपींच्या मागावर होतं. सापळा रचून या पथकानं विजय यावलकर यांच्याशी संपर्क साधून त्याला शिताफिनं पुण्याच्या अन्य एका आरोपीसह भंडाऱ्यातून अटक केली. या कारवाईमुळे भंडारा जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागातील आरोग्य सेवक या रिक्त पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावावर तरुणांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा अमरावती पोलिसांनी भंडाऱ्यात पर्दाफाश केला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भंडाऱ्याच्या एकाचा तर, पुणे येथील एकाचा अशा दोघांचा समावेश आहे. त्यांच्याकडून आरोग्य सेवक पदाचे बनावट जॉइनिंग लेटर आणि त्यासाठी लागणाऱ्या अधिकाऱ्याच्या पदाचे बनावट सिक्के या पोलीस पथकानं ताब्यात घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. विजय यावलकर असं भंडाऱ्यातून अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून पुण्याच्या व्यक्तीचं नाव तपास अधिकाऱ्यांनी सांगण्यास नकार दिला. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा समावेश असून त्यांनाही लवकर ताब्यात घेण्यात येईल, असं अमरावती पोलिसांनी सांगितलं.
