जाफराबाद प्रतिनिधी: (दिनांक ०७नोव्हेंबर २०२५) येथील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला दिवस ७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख होते तर उपप्राचार्य प्रा.विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ.रमेश देशमुख म्हणले की, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हाच खरा प्रगतीचा मूलमंत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. शिक्षणाशिवाय प्रगतीचा वेगळा मार्ग असुच शकत नाही,म्हणून विद्यार्थ्यांनी जीवनात शॉर्टकट न वापरता शिक्षणाच्या प्रवाहात कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करायची जिद्द असणे हेच खरा विद्यार्थीधर्म आहे आणि याचा आदर्श म्हणाजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य आपल्या डोळ्यासमोर कायम असले पाहिजे.७ नोव्हेंबर १९०० हा दिवस भारतीय समाजाच्या इतिहासातील एक प्रेरणादायी क्षण ठरला. या दिवशी साताऱ्यातील प्रतापसिंग प्राथमिक शाळेत छोट्या ‘भिवा’ने (बाबासाहेबांचे बालपणातील नाव) पहिल्यांदा शाळेची पायरी चढली. त्या बारक्या पावलांनी केवळ शाळेकडे नव्हे, तर एका नव्या युगाच्या दिशेने वाटचाल केली. म्हणूनच आजचा दिवस ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जातो.शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ साली असलेली बाल भिवाची स्वाक्षरी आजही जपलेली आहे. हा इतिहासाचा मौल्यवान पुरावा आहे. वर्गाबाहेर बसून शिक्षण घेणारा आणि पाण्याच्या एका घोटासाठीही वंचित असलेला तोच विद्यार्थी पुढे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ठरला. हा प्रवास म्हणजे शिक्षणाच्या शक्तीचा पुरावा आहे.
२०१७ साली शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे ७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले. या दिवशी शाळांमध्ये डॉ.आंबेडकरांच्या जीवनावर आधारित निबंध, वक्तृत्व आणि कविता वाचन स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाते. आजच्या डिजिटल युगात माहिती सहज मिळते, पण ज्ञानाचा दीप जपणे ही खरी जबाबदारी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणप्रवास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरतो असे विस्तृत मार्गदर्शन अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.रमेश देशमुख यांनी केले. कार्यकमास महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.भालचंद्र येवले यांनी केले तर आभार डॉ.प्रमोदसिंह राजपूत यांनी मानले.
