जाफ्राबाद, (दि. १६ नोव्हेंबर)
जालना – जाफ्राबाद तालुक्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जाफ्राबाद तालुका शासकीय वसतिगृह व निवासी शाळा लवकरच सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रदीर्घ मागणीला यश
जाफ्राबाद तालुका वसतिगृह व निवासी शाळा मूळात २००८ साली मंजूर झाले होते. मात्र, काही राजकीय घडामोडींमुळे ते घनसावंगी येथे हस्तांतरित करण्यात आले होते. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जाफ्राबाद तालुक्यातील विद्यार्थी शासकीय वसतिगृह सुविधेपासून वंचित होते. या मागणीसाठी जाफ्राबाद तालुका आणि जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध मार्गांनी सातत्याने प्रयत्न केले होते. यामध्ये आमरण उपोषण, निवेदने आणि संबंधित विभागाकडे तक्रारी यांचा समावेश होता. मात्र, केवळ आश्वासनेच मिळत होती.
रावसाहेब दानवे यांना विनंती
या गंभीर प्रश्नावर अखेरीस, आंदोलक आणि या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे राहुल गवई यांनी देशाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. गवई यांनी दानवे यांच्याकडे वसतिगृह व निवासी शाळा तात्काळ सुरु करण्याची विनंती केली.
दानवे यांचे सकारात्मक आश्वासन
राहुल गवई यांच्या विनंतीला मान देऊन, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हे वसतिगृह लवकरात लवकर सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन दिले आहे. जाफ्राबाद तालुक्यातील अनेक समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील समाजबांधवांनी यासाठी प्रयत्न आणि विनंती केली आहे. आता दानवे यांच्या आश्वासनामुळे सकारात्मक पाऊले पडतील आणि हे वसतिगृह लवकरच सुरु होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सदर वसतिगृह सुरू झाल्यास जाफ्राबाद तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून त्यांचा मोठा फायदा होणार आहे.
प्रतिनिधी राहुल गवई,
एनटीव्ही न्यूज मराठी, जाफ्राबाद, जालना.
