
तुळजापूर प्रतिनिधी, (दि. १० डिसेंबर)
धाराशीव: तुळजापूर प्रशासनात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, महसूल विभागात मोठी खळबळ माजली आहे. तुळजापूर येथील तहसीलदार अरविंद बोळंगे यांना ब्लॅकमेल करून, त्यांच्याविरुद्ध पोलिसात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल यांच्यासह अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वादाची ठिणगी नेमकी कशी पडली?
एका बँकेने चुकून तहसीलदार बोळंगे यांचा फोन नंबर मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल यांना दिला होता. याच फोन नंबर वरून बहिरमल यांच्याकडून तहसीलदारांना वारंवार फोन करून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून तहसीलदार बोळंगे यांनी बहिरमल यांना समजावून सांगितले. मात्र, यानंतर बहिरमल यांनी उलट आनंदनगर पोलीस ठाण्यात तहसीलदार बोळंगे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
खंडणीची धक्कादायक मागणी
तक्रार दाखल झाल्यानंतर मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल आणि त्यांचे वकील बालाजी बोके यांनी तहसीलदारांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.
तहसीलदार बोळंगे यांनी केलेल्या आरोपानुसार, खंडणीची मागणी खालीलप्रमाणे करण्यात आली:
- सुरुवातीला १५ लाख रुपये
- त्यानंतर १० लाख रुपये
- आणि अखेरीस २ लाख रुपये
अशाप्रकारे रकमेची मागणी करत तहसीलदारांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.
या गंभीर आरोपामुळे संपूर्ण महसूल विभाग हादरला असून, तुळजापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्ध पातळीवर सुरू केला आहे.
प्रतिनिधी आयुब शेख,
एनटीव्ही न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशीव.
