• तब्बल आठ वर्षांनंतर नगर शहराला मिळणार नवे कारभारी..!
  • निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग..!

अहिल्यानगर प्रतिनिधी, (दि. १५ डिसेंबर)

अहिल्यानगर: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. शहराचे ६८ कारभारी निवडण्यासाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. महापौरपदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणूक कार्यक्रम अचानकपणे जाहीर होताच राजकीय पक्ष आणि इच्छुकांची धांदल उडाली आहे.

तीन वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्टात

  • अहिल्यानगर महापालिकेची शेवटची निवडणूक २०१८ मध्ये झाली होती. विद्यमान नगरसेवकांचा कालावधी डिसेंबर २०२३ मध्येच संपला होता.
  • आरक्षण याचिका न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे अहिल्यानगर महापालिकेवर तब्बल तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू होती.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया जानेवारी २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मिळाल्यानंतर प्रभाग रचना, प्रभागनिहाय आरक्षण अंतिम करून मतदारयादीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.

निवडणूक कार्यक्रम

  • १५ डिसेंबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होताच, त्याच दिवशी सायंकाळी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.
  • मतदान: १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे.
  • मतदारसंख्या: शहरातील ३ लाख ७ हजार ९ मतदार त्यांचे ६८ कारभारी निवडण्यासाठी मतदान करणार आहेत.
  • प्रभागाची रचना: महापालिकेसाठी १७ प्रभाग असून, प्रत्येक प्रभाग चार सदस्यीय आहे.
  • मतदानाचा अधिकार: एका प्रभागातून चार नगरसेवक निवडायचे असल्याने, प्रभागातील प्रत्येक मतदाराला चार मतांचा अधिकार असणार आहे, ज्यात दोन महिला उमेदवारांचा समावेश असेल.

राजकीय वातावरण तापणार

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धांदल उडाली आहे. महापौरपदाचे आरक्षण जाहीर नसतानाही राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा बिगुल वाजवल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीमुळे महिनाभर शहरातील राजकीय वातावरण ऐन थंडीतही तापणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *