बनावट सोन्याच्या माळा, सह मुद्देमाल हस्तगत
जामखेड, ता. १६ : बनावट सोने खरे असल्याचे भासवून विक्री करणारी आंतरराज्य टोळी सापळा रचून जेरबंद करण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात २८ नोव्हेंबर रोजी शहरातील कापड दुकानदार गणेश महादेव खेत्रे यांना अशोक मिस्त्री (उत्तमकुमार मोकाराम बागरी, रा. धानसा, ता. भिनमाल, राजस्थान) याने त्याचे सोबत असलेला आरोपी मोहनलाल बालाजी बागरी (वय ५६, वर्षे रा. धानसा, ता. भिनमाल, राजस्थान) काही कपडे खरेदी करून, एका पिवळ्या धातूच्या माळेतील एक मणी दिला, तसेच नाशिक या ठिकाणी खोदकाम करताना हे आम्हाला मिळून आले आहेत. तुम्ही सोनाराकडे जाऊन हे सोने आहे का, याची खात्री करा व आम्हाला पैशाची गरज असल्याने आठ लाख रुपयांमध्ये आमच्याकडील सर्व माल विकत घ्या,
असे सांगितले. दरम्यान, आरोपींनी वेळोवेळी त्यांच्याकडील बनावट सोने खेत्रे यांना विकण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर संपर्क करत होते.
दरम्यान, आरोपींनी सोमवारी (ता.१५) दुपारी पावणेतीनच्या सुमारास जामखेड-खर्डा रस्त्यावरील रंगोली हॉटेलच्या जवळ थांबून खेत्रे यांना ठरलेली रक्कम घेऊन बोलावले होते.
सदर घटनेची बातमी गुप्त बातमीदारामार्फत जामखेड पोलिसांना मिळाली होती. गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी खबरदारी घेतली. जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस पथक खर्डा रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते. त्याचवेळी हॉटेल रंगोली याठिकाणी खेत्रे, त्यांचा भाऊ व मित्र असे चारचाकी वाहनातून गेले. तेथे आरोपींनी खेत्रे यांना त्यांच्याकडील बनावट सोने देवून, पैशाची मागणी केली. त्याचवेळी खेत्रे यांनी हे सोने नसून, बनावट सोन्याचे दागिने आहेत, असे
म्हणताच अशोक मिस्त्री, प्रवीणकुमार मोहनलाल बागरी यांनी खेत्रे यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम, तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
यावेळी गोंधळ आणि आरडाओरड झाल्याचे लक्षात येताच खर्डा रस्त्यावर सापळा रचून पेट्रोलिंग करत असलेले जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक वाघ, पळसे, घोळवे व शेवाळे यांनी तत्काळ आरोपीस ताब्यात घेतले. आरोपींकडे विचारपूस केली असता, आरोपींनी त्यांच्या सोबत असलेला एक साथीदार हा खर्डा बसस्थानक येथे थांबला असल्याचे सांगितले. यावर या पथकाने तत्काळ खर्डा येथून मोहनलाल बालाजी बागरी यास ताब्यात घेतले. गुन्ह्यातील आरोपींच्या अंगझडतीत खेत्रे यांची काढून घेतलेली रोख रक्कम, तसेच अंदाजे एक किलो वजनाच्या पिवळ्या धातूच्या बनावट सोन्याच्या माळा, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत .
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124
