धाराशिव | प्रतिनिधी : आयुब शेख
धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. युवासेनेचे शहरप्रमुख अनिल दाणे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केल्याने ठाकरे गटात मोठे खिंडार पडले आहे. यांच्यासोबत धाडस ग्रुपचे अध्यक्ष अभय डोणे, युवानेते रोहित निकम आणि राजसिंह गावडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
या घडामोडीमुळे बेंबळी परिसरात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटाची स्थानिक संघटनात्मक ताकद या प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे.

हा प्रवेश कार्यक्रम धाराशिव जिल्ह्याचे भाजप नेते व तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच बेंबळी व परिसरातील विकासकामांना गती मिळावी या उद्देशाने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
या राजकीय घडामोडींमुळे बेंबळी परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
