नागपूर-काटोल महामार्गावरील डोरली शिवारात मालवाहू वाहनाचा भीषण अपघात.
वाहनावरील ताबा सुटल्याने पुलाला बसली जोरात धडक; वाहनाचा पुढचा भाग चेंदामेंदा.
एका महिलेचा जागीच मृत्यू, तर १३ वर्षांच्या मुलीसह नऊ जण गंभीर जखमी.
स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
NAGPUR | कळमेश्वर तालुक्यातील डोरली शिवारात रविवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू वाहनाने पुलाला जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४० / सीडी ३२०४ क्रमांकाचे मालवाहू वाहन नागपूरवरून कळमेश्वरमार्गे काटोल येथे जात होते. दरम्यान, डोरली शिवारातील एका पुलावर वाहन अनियंत्रित झाल्याने पुलाला जाऊन धडकले. ही धडक इतकी भीषण होती की वाहनाच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात विमला रामस्वरूप साहू (५५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तर पूनम सुनील साहू (३२, शिवांगीनगर, नागपूर), रामस्वरूप शंकर साहू (५५, कालडोंगरी, नागपूर), माही सुनील साहू (वय १३, हुडकेश्वर, नागपूर), भांजू रामस्वरूप साहू (वय २५, कालडोंगरी-हुडकेश्वर, नागपूर), सृष्टी अतुल महेशकर, आरोही अतुल महेशकर, आशिष रामस्वरूप साहू (२२), मयंक सुनील साहू (१२) व पीयूष रामस्वरूप साहू (२०, कालडोंगरी, वर्धारोड जामठा, नागपूर) हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे व लोणकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी मंगेश उराडे, एनटीव्ही न्यूज मराठी, नागपूर.
