- कर्जत-जामखेडमध्ये पावसाने ओढ दिली
- खरीप पिके पावसाअभावी धोक्यात
- कापूस, सोयाबीनसह पिकांची वाढ खुंटली
- जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ
- रोजगारासाठी तरुणांचे शहरांकडे स्थलांतर
- शासनाकडून मदतीची नागरिकांची मागणी
AHILYANAGAR | कर्जत-जामखेड तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक तिहेरी संकटाचा सामना करत आहेत. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत, तर वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पिकांची पेरणी केली. मात्र पुरेशा पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत. उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. काही शेतकरी दुबार पेरणीची तयारी करत असले तरी पावसाच्या अनिश्चिततेमुळे चिंता कायम आहे.
दुसरीकडे खाद्यतेल, शेंगदाणे, तूरडाळ, मुगडाळ, उडीद डाळ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. वाढत्या किराणा दरामुळे सामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडले आहे.
ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी कमी झाल्याने जामखेड परिसरातील तरुण मुंबई, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरांकडे स्थलांतर करत आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे.
दुष्काळसदृश्य परिस्थिती, शेतीचे नुकसान आणि वाढती महागाई या संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीक विमा, नुकसानभरपाई आणि रोजगार निर्मितीच्या उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी | जामखेड
