- चौथीच्या शिष्यवृत्ती निकालावर गंभीर प्रश्न
- १२४ पैकी १२१ विद्यार्थी उर्दू माध्यमाचे
- १४१ शाळांचा निकाल शून्य असल्याचा दावा
- दोन परिसरांतून १०३ विद्यार्थी निवड
- सलग आसनक्रमांकांवर पालकांचा संशय
- शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल
JALGAON | जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात इयत्ता चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच PSE 2026 च्या निकालातील काही आकडेवारीवरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पालकांनी या प्रकरणाची सखोल तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली असून, शिक्षण विभागाने पुणे येथील आयुक्तांकडे तक्रार पाठवली आहे.
उपलब्ध Approved Merit List नुसार यावल तालुक्यातील मंजूर १२४ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांपैकी १२१ विद्यार्थी उर्दू माध्यमाचे असल्याचे दिसून येते. हे प्रमाण ९७.५८ टक्के असून, मराठी माध्यमाचे तीन विद्यार्थी असल्याचे नमूद आहे. उर्दू माध्यमातील विद्यार्थी गुणवंत ठरणे चुकीचे नसले तरी एवढी मोठी माध्यमनिहाय तफावत असल्याने एकूण परीक्षार्थी संख्या, माध्यमनिहाय परीक्षार्थी, मागील वर्षांचे निकाल आणि इतर तालुक्यांतील निकालांची तुलना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उपलब्ध निकालाच्या विश्लेषणानुसार १२४ पैकी १०३ विद्यार्थी केवळ मारुळ आणि फैजपूर परिसरातील शाळांमधील असल्याचे दिसते. त्यात मारुळचे ४० आणि फैजपूरचे ६३ विद्यार्थी आहेत. म्हणजेच जवळपास ८३ टक्के मंजूर विद्यार्थी दोनच परिसरांतील आहेत.
Center Code 331303 शी संबंधित निकालात काही ठिकाणी सलग आसनक्रमांकांचे समूह दिसून येत असून, या समूहातील अनेक विद्यार्थ्यांना उच्च गुण मिळाल्याचे पालकांनी निदर्शनास आणले आहे. मात्र, सलग सीट नंबर आणि उच्च गुण मिळणे म्हणजे गैरप्रकार सिद्ध झालेला नाही. त्यामुळे OMR आणि केंद्रनिहाय डेटाचे तांत्रिक ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उपलब्ध School Result Summary नुसार यावल तालुक्यातील १५२ पैकी १४१ शाळांचा निकाल शून्य टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रनिहाय आणि शाळानिहाय सांख्यिकीय तपासणी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी पुणे येथील आयुक्तांकडे तक्रार पाठवली असून, त्याची शहानिशा होईल, असे सांगितले आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव
