यावल शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनची अवस्था बिकट असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू असलेल्या या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

यावल येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनमध्ये इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेला स्वतःच्या मालकीची इमारत नसल्यामुळे भाडेतत्त्वावरील जागेत शाळा सुरू आहे. मात्र, या इमारतीची अवस्था अत्यंत खराब असल्याचे दिसून येत आहे.

शाळेच्या छतावरील पत्रे गंजलेली असून, काही ठिकाणी कुजलेली पत्रे केवळ लाकडांच्या आधारावर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मोकळ्या विजेच्या तारांवर लाकडी दांड्याला लावलेला पंखा असल्याने अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.

पावसाळ्यात छत गळत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो, तर उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे विद्यार्थी बेजार होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या मालकीची सुरक्षित इमारत कधी मिळणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

मान्यता मिळालेली असताना शाळेसाठी स्वतःची इमारत का नाही, तसेच दुर्घटना घडल्यानंतरच शासन जागे होणार का, असा सवाल पालकांकडून केला जात आहे.

शाळेला स्वतःची इमारत उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचा त्रास तातडीने दूर करावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. तसेच सुविधायुक्त इमारत उपलब्ध करून त्यामध्ये शाळा स्थलांतरित करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *