जळगावहून यावल येथे परत येत असताना बोरावल गावाजवळ जोरदार वाऱ्यासह पावसामुळे रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
सुमारे एक तास वाहतूक बंद राहिल्यानंतर यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील आणि नगरसेवक अतुल पाटील हे त्याच मार्गावरून जात असताना त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले.
नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच अतुल पाटील यांनी बोरावल येथील मित्र शांताराम धनगर, उमेश पाटील आणि अमोल राणा यांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
दरम्यान, नगराध्यक्षा छायाताई पाटील यांनी यावल नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून रेस्क्यू व्हॅन आणि जेसीबी तातडीने घटनास्थळी पाठविण्याच्या सूचना दिल्या. कर्मचारी आणि जेसीबी दाखल झाल्यानंतर त्यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून आवश्यक सूचना दिल्या. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर कोसळलेले झाड बाजूला करण्यात आले आणि काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अचानक आलेल्या नैसर्गिक संकटाच्या प्रसंगी नगराध्यक्ष छायाताई पाटील आणि नगरसेवक अतुल पाटील यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अडकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला. बोरावल येथील नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांनी त्यांच्या तत्परतेचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
