अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देत माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने लंके यांच्याकडून उत्तर मागितले आहे.
डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या निवडणूक याचिकेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कथित भ्रष्ट आचरण, निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक निवडणूक खर्च तसेच मतदान प्रक्रियेतील कथित अनियमिततांसह विविध आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप याचिकेतील असून त्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
२४ सप्टेंबर २०२६ रोजी हे प्रकरण भारताचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आले.
याचिकाकर्ते डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता नीरज किशन कौल यांनी बाजू मांडली. यावेळी वरिष्ठ अधिवक्ता संजय खर्डे, अधिवक्ता अनिरुद्ध देशमुख, ए.ओ.आर., अधिवक्ता सत्यजीत खर्डे, अधिवक्ता सनी जाधव आणि अधिवक्ता अरुण लोंगानी उपस्थित होते.
सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने विखे-पाटील यांच्या याचिकेवर नोटीस जारी करून खासदार नीलेश लंके यांच्याकडून उत्तर मागितले आहे.
यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ८ एप्रिल २०२६ रोजी विखे-पाटील यांची निवडणूक याचिका फेटाळली होती. त्या निर्णयाला विखे-पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
त्यामुळे अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीशी संबंधित या न्यायालयीन प्रकरणाच्या पुढील कार्यवाहीकडे आता लक्ष लागले आहे.
