एरंडोलमध्ये साक्षरता परीक्षेला आजी-आजोबांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तालुक्यातील ९० परीक्षा केंद्रांवर आयोजन

तब्बल २ हजार १४६ जणांनी दिली परीक्षा

महिलांचा सहभाग १ हजार ३६४; पुरुष ७८२

वाचन, लेखन आणि संख्याज्ञानाची मूल्यमापन चाचणी

३० परीक्षार्थी गैरहजर; पुढील संधीची उत्सुकता

JALGAON | शिक्षणासाठी वयाची मर्यादा नसते, हे एरंडोल तालुक्यातील आजी-आजोबांनी दाखवून दिलं आहे. ‘उल्लास नवभारत साक्षरता अभियाना’अंतर्गत तालुक्यातील २ हजार १४६ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. ९० केंद्रांवर पार पडलेल्या या उपक्रमातून साक्षरतेचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

केंद्र शासनाच्या ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमा’अंतर्गत एरंडोल तालुक्यात रविवारी, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी उत्साहात पार पडली.
तालुक्यातील ९० परीक्षा केंद्रांवर २ हजार १४६ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. यामध्ये १ हजार ३६४ महिला आणि ७८२ पुरुषांचा समावेश आहे. एकूण २ हजार १७६ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३० जण गैरहजर राहिले. परीक्षार्थींना आपल्या सोयीनुसार केंद्रावर जाऊन तीन तासांत पेपर सोडवता आला, तर दिव्यांग परीक्षार्थींना ६० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांनी दिली.
ही परीक्षा १०० गुणांची होती. वाचन-लेखन आणि संख्याज्ञान या दोन घटकांवर प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न विचारण्यात आले. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक घटकात किमान ३३ टक्के गुण आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, गैरहजर राहिलेल्या ३० परीक्षार्थींना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.
जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण आणि गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परीक्षा केंद्रांवर नियोजन करण्यात आले होते. या आयोजनासाठी एरंडोल तालुका समन्वयक एल. आर. पाटील आणि शिक्षकवर्गाने विशेष परिश्रम घेतले.
‘उल्लास नवभारत साक्षरता अभियाना’तर्गत वाचन, लेखन आणि मूलभूत गणिती क्रियांबरोबरच बँकिंग व्यवहार व डिजिटल सेवांचा वापर, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरूकता, शासकीय योजनांची माहिती, स्वतःच्या हक्कांची जाणीव आणि पर्यावरणविषयक जागरूकता यांवरही भर दिला जात आहे.
अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी नागरिकांना साक्षरतेच्या मुख्य प्रवाहात आणणारा हा उपक्रम एरंडोल तालुक्यात प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *