दहिगावातील सार्वजनिक चौकात गुलालाचे थर

ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

कचऱ्याचे ढिगारे वेळेवर उचलले जात नसल्याची तक्रार

गावात धूळ आणि डासांचे प्रमाण वाढले

साथीचे आजार सुरू, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न

प्रशासकीय कारभारावर ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त

JALGAON | जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथे स्वच्छतेच्या प्रश्नावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक चौकातील गुलालाचे थर, कचऱ्याची समस्या आणि वाढत्या डासांमुळे नागरिक त्रस्त असल्याचे चित्र असून, ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथे स्वच्छतेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, काही नागरिकांकडून पाण्याची नासाडीही होत असल्याचे दिसून येत आहे.
गावातील दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान उधळण्यात आलेल्या गुलालाचे थर अद्यापही सार्वजनिक चौकात साचलेले आहेत. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत. आठवड्यातून केवळ एकदाच सार्वजनिक चौकाची साफसफाई केली जात असल्याचे सांगण्यात येत असून, कचऱ्याचे ढिगारेही व्यवस्थित उचलले जात नसल्याचा आरोप आहे.
ग्रामपंचायतीचे प्रशासक नेमके कधी येतात आणि कधी येत नाहीत, याबाबतही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासक राजमुळे प्रशासन आपल्या मनाप्रमाणे कारभार करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. तसेच कर्मचारी मनमानी करून साफसफाईकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावातील गटारींची साफसफाई वेळेवर होत नसल्याने आणि परिसरात धूळ निर्माण होत असल्याने डास व मच्छरांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार आहे. विशेषतः वाढीव वस्त्यांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या साथीचे आजार सुरू असतानाही गावात व्यवस्थित साफसफाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक चौक, गटारी आणि गावातील विविध भागांची नियमित साफसफाई करावी, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी आणि स्वच्छतेच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *