जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात कोळन्हावी गावात घरफोडीची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

यावल तालुक्यातील कोळन्हावी गावात अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरफोडी केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. गावातील भूषण वासुदेव सोळंके हे कुटुंबासह घराच्या पुढील खोलीत झोपलेले असताना मध्यरात्री चोरट्यांनी मागील दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातील कपाटातून ९४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ६ हजार रुपये रोख, असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी बॅग आणि इतर साहित्य गावाबाहेर नदीच्या काठी सोडून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी आणि किशोर परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *