जिद्द, संयम आणि संघर्षाच्या जोरावर स्वप्न पूर्ण करता येते, हे डॉ. मनिषा महाजन यांनी सिद्ध केले आहे. एमबीबीएसनंतर सुमारे दहा वर्षे वैद्यकीय सेवा बजावल्यानंतर वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालयातून मानसोपचारशास्त्रातील MD पदवी संपादन केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रापासून मुंबईतील नायर रुग्णालयापर्यंतचा डॉ. मनिषा महाजन यांचा प्रवास ग्रामीण भागातील डॉक्टर, विद्यार्थी आणि महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. एमबीबीएसनंतर सुमारे दहा वर्षे वैद्यकीय सेवा बजावल्यानंतर त्यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून MD Psychiatry अर्थात मानसोपचारशास्त्रातील पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यांच्या या यशाचे जळगाव जिल्ह्यात कौतुक होत आहे.

किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच वर्षे सेवा

डॉ. महाजन यांनी किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सलग पाच वर्षे सेवा बजावली. त्यांच्या कार्यकाळात किनगाव येथील नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. ग्रामीण भागात काम करताना मानसिक आरोग्याच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात आल्याने त्यांनी या क्षेत्रात तज्ज्ञ होण्याचा निर्णय घेतला.

एकाच दिवशी चार हजार नागरिकांची आरोग्य तपासणी

मुंबईला रवाना होण्याच्या एक महिना आधी त्यांनी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत किनगाव येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात एकाच दिवशी सुमारे चार हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने पार पडलेले हे शिबिर किनगाव परिसरासाठी महत्त्वपूर्ण ठरले.

कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबत यशस्वी वाटचाल

या आव्हानात्मक प्रवासात रात्रपाळ्या, अभ्यासाचा ताण आणि आरोग्यविषयक अडचणींवर मात करत डॉ. महाजन यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली. या काळात त्यांचा मुलगा पृथ्वीराज याने CBSE दहावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवले. त्यांच्या या प्रवासात आई प्रमिला महाजन, पती अनिरुद्ध महाजन आणि मुलगा पृथ्वीराज यांची मोलाची साथ लाभली.

आगामी काळात ग्रामीण भागात मानसिक आरोग्याबाबत जनजागृती, नैराश्य आणि चिंतेविषयी मार्गदर्शन, व्यसनमुक्ती तसेच आत्महत्या प्रतिबंधक कार्यात डॉ. मनिषा महाजन यांचा अनुभव महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *