जळगाव : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रामपंचायतींचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायतीला २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
ग्रामपंचायतीच्या या उल्लेखनीय यशामुळे साकळी गावाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या पुरस्कारामुळे सरपंच दीपक नागो पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांचे तालुक्यासह जिल्हाभरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी विभागीय व जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जाहीर करण्यात आले आहेत. दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार साकळी ग्रामपंचायतीने जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळवला आहे.
गावातील स्वच्छता, विकासकामे, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांच्या जोरावर साकळी ग्रामपंचायतीने हे यश संपादन केले आहे. सरपंच दीपक नागो पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या वर्षभरात सातत्याने प्रयत्न केले. गावातील विविध समस्या सोडविणे, नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सरपंच दीपक नागो पाटील म्हणाले की, “या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय माझे एकट्याचे नसून साकळी गावातील सर्व ग्रामस्थांचे आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी आणि विकासासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी सहकार्य केले. ग्रामपंचायत सदस्यांनीही मोलाची साथ दिली. गेल्या वर्षभरात गावात विविध उपक्रम राबविण्यात आले. नागरिकांच्या भावना समजून घेत त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच आज हे यश मिळाले आहे.”
या पुरस्काराचे वितरण लवकरच शासनामार्फत आयोजित कार्यक्रमात ग्रामविकास व पंचायतराज मंत्री, संबंधित पालकमंत्री तसेच राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
साकळी ग्रामपंचायतीने मिळविलेल्या या यशामुळे गावाच्या विकासाची नवी दिशा निश्चित झाली असून, या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
