ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचा भोसगा येथे स्तुत्य उपक्रम; ३० महिला आणि ३० विद्यार्थ्यांना मदतीचे वाटप
धाराशिव | दुष्काळाच्या झळांमुळे शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले असताना, गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आहे. फाउंडेशनच्या ‘बळीराजा आधार अभियान २०२६-२७’ अंतर्गत लोहारा तालुक्यातील भोसगा येथे ३० गरजू महिलांना साडी-चोळी, तर ३० विद्यार्थ्यांना शालेय बॅगा व शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले.
भोसगा ग्रामपंचायत कार्यालयात हा मदतवाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. दुष्काळामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांतील महिलांना दिलासा मिळावा, तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
यावेळी ॲड. शीतल चव्हाण यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना दुष्काळावर मात करण्यासाठी केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. ‘बळीराजा आधार अभियान’च्या माध्यमातून शेतकरी संवाद, दुष्काळ सर्वेक्षण, जलसंधारणासाठी लोकसहभाग आणि गरजू कुटुंबांना मदत असे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला माजी सरपंच मुकेश सोनकांबळे, ग्रामपंचायत सदस्य अप्पाराव पाटील, माजी उपसरपंच वैजीनाथ कागे, यल्लालिंग एकुंडे, राजेंद्र मानाळे, काकासाहेब टेंगळे यांच्यासह महिला, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फाउंडेशनच्या वतीने ॲड. शीतल चव्हाण, प्रा. राजू बटगिरे, किशोर बसगुंडे आणि पवन थोरात यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
मदतीचा हात, जलसंधारणाला साथ!
‘आज गरजूंना मदतीचा हात, उद्यासाठी पाण्याची सोय आणि पुढील पेरणीसाठी शेतकऱ्यांना बळ’ या संकल्पनेतून उमरगा आणि लोहारा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे.
दुष्काळाच्या कठीण काळात गरजू महिलांना मदत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाला प्राधान्य देणारा फाउंडेशनचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
प्रतिनिधी सचिन बिद्री
