दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले असताना कर्जवसुलीचा तगादा थांबवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी शिराढोण येथे उपोषणाला बसलेल्या शिवकन्या स्वामी यांची आमदार कैलास पाटील यांनी भेट घेतली. यावेळी नेमकी काय भूमिका मांडण्यात आली? पाहूया हा रिपोर्ट.

धाराशिव जिल्ह्यातील शिराढोण येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात दुष्काळ निवारण होईपर्यंत खाजगी बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली तात्काळ स्थगित करावी, तसेच सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याज माफ करावे, या प्रमुख मागण्यांसाठी सौ. शिवकन्या स्वामी उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या उपोषणस्थळी आमदार कैलास पाटील यांनी भेट दिली.

यावेळी आमदार कैलास पाटील यांनी शिवकन्या स्वामी यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांवर ओढवलेल्या आर्थिक संकटाची माहिती घेतली. त्यांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकरी आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

दुष्काळामुळे शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक कुटुंबांना दैनंदिन गरजा भागवणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत खाजगी बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कर्जवसुली एजंटांकडून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना धमक्या देणे, दबाव आणणे तसेच मानसिक त्रास देण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप करत अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत कर्जवसुलीच्या जाचातून जनतेला दिलासा मिळावा, कर्जवसुली तात्पुरती थांबवावी आणि कर्जावरील व्याज माफ करावे, अशी ठाम भूमिका उपोषणाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.

सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटातून दिलासा मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *