रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार अनुप संजय धोत्रे यांच्या पत्रावर दिली मंजुरी; २८ नोव्हेंबरपासून थांबा सुरू होणार असल्याची माहिती
अकोलेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अकोला रेल्वे स्थानकावर पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेसला थांबा मिळावा, अशी मागणी बऱ्याच काळापासून केली जात होती. अखेर या मागणीला रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेसला अकोला रेल्वे स्थानकावर थांबा देण्यास मंजुरी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यासंदर्भात खासदार अनुप संजय धोत्रे यांनी ९ जून २०२६ रोजी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून अकोला जंक्शनवर सदर रेल्वेगाडीला थांबा देण्याची मागणी केली होती. या पत्राचा संदर्भ देत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले आहे की, गाडी क्रमांक १२२२१/१२२२२ पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेसला अकोला जंक्शनवर थांबा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
येत्या २८ नोव्हेंबरपासून या ट्रेनचा अकोला स्थानकावर थांबा सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे अकोल्यासह आसपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना पुणे आणि हावडा येथे प्रवास करण्यासाठी मोठी सोय होणार आहे. विशेषतः व्यावसायिक, नोकरदार तसेच इतर प्रवाशांना याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. अकोला रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या एक्सप्रेस ट्रेनच्या थांब्याला मंजुरी मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
