एरंडोल शहरातील जुन्या कासोदा रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. अवघ्या ५०० मीटरच्या रस्त्यावर खड्डे आणि धुळीचे साम्राज्य पसरले असून, जिल्हा परिषद आणि नगरपालिका प्रशासनाच्या समन्वयाअभावी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

एरंडोल शहरातील नगरपालिका उद्यानापासून राष्ट्रीय महामार्गाच्या जोडबिंदूपर्यंत जाणारा सुमारे ५०० मीटर लांबीचा जुना कासोदा रस्ता सध्या खड्डे, माती आणि धुळीच्या विळख्यात सापडला आहे. प्रशासकीय अनास्था आणि जिल्हा परिषद व नगरपालिका या दोन यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे या वर्दळीच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

खड्ड्यात माती टाकल्याने धुळीत भर

या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून अपघाताची भीतीही निर्माण झाली आहे.

खड्डे बुजविण्यासाठी टाकलेली माती वाहनांच्या वर्दळीमुळे हवेत उडून रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या घरांमध्ये, अंगणात आणि दुकानांमध्ये साचत आहे. घरातील साहित्य, खिडक्या आणि दरवाजांवर धुळीचे थर जमा होत असल्याने नागरिकांना स्वच्छता राखणे कठीण झाले आहे.

या रस्त्याची जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून निधीअभावी दुरुस्तीचे काम प्रलंबित असल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे, नगरपालिकेतर्फे रस्त्यावर माती टाकली जात असल्याने धुळीचा त्रास अधिकच वाढल्याचे चित्र आहे.

सतत उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, पादचारी आणि श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दमा, खोकला, सर्दी, श्वसनाचे विकार आणि डोळ्यांची जळजळ यांसारख्या आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

शहराच्या इतर भागांत विविध विकासकामे सुरू असताना हा महत्त्वाचा जोडरस्ता दुर्लक्षित राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

रस्त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? नागरिकांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार? आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार? असे संतप्त सवाल रहिवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि एरंडोल नगरपालिका प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवण्याऐवजी संयुक्तपणे तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

यामध्ये रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी आवश्यक निधी मंजूर करून डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, तोपर्यंत सुमारे ५०० मीटरच्या या पट्ट्यात दररोज नियमित पाणीफवारणी करून धुळीवर नियंत्रण मिळवावे, तसेच खड्ड्यांमध्ये माती टाकण्याऐवजी तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने तात्पुरती दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *