वाढदिवस म्हटला की हारतुरे, सत्कार आणि जल्लोष… मात्र यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आपल्या वाढदिवशी वेगळाच आदर्श घालून दिला. अनाथ मुले, वृद्ध आणि निराधार व्यक्तींसोबत वेळ घालवत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.

यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी २४ नोव्हेंबर २०२६ रोजी आपला वाढदिवस चोपडा तालुक्यातील वेले येथील अमर संस्था संचलित अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आणि प्रभू आश्रमात साजरा केला. विशेष म्हणजे, याच दिवशी गुरुनानक जयंतीची सुट्टी होती.

वाढदिवसानिमित्त त्यांनी आश्रमातील मुलांना केळी, सफरचंद, पेरू, जांभूळ आणि डाळिंब यांसह विविध फळांचे वाटप केले. तसेच वृद्धाश्रमात राहणाऱ्या १३ आजी-आजोबांना हिवाळ्यापासून संरक्षण मिळावे यासाठी स्वेटर आणि कानटोप्यांचे वाटप केले.

हारतुरे किंवा कोणताही औपचारिक कार्यक्रम स्वीकारण्याऐवजी आपल्या कमाईतील खारीचा वाटा गरजूंसाठी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत केक कापून त्यांनी दिवसभर त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि संस्थेच्या कामकाजाची पाहणी केली.

यावेळी अमर संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब चंद्रकांत गुलाबराव पाटील (कोसगावकर) आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. संस्थेचे शेषराव पाटील सर यांनी संस्थेच्या सद्यस्थितीची आणि सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती तहसीलदारांना दिली.

अनाथ आणि वृद्धांच्या संगोपनासोबतच प्रभू आश्रमात मानसिक स्थिती ठीक नसलेल्या, रस्त्यावर भटकणाऱ्या व्यक्तींना आश्रय देऊन त्यांच्यावर औषधोपचार केले जातात. त्यांची ओळख आणि घरचा पत्ता समजल्यावर त्यांना त्यांच्या घरी पाठवण्याचे कामही संस्था करते. या उपक्रमाचे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी विशेष कौतुक केले.

विशेष म्हणजे, कोणतेही शासकीय अनुदान न घेता अमर संस्थेतर्फे हे कार्य सुरू आहे. याप्रसंगी यावल तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाच्या अव्वल कारकून वैशाली पाटील उपस्थित होत्या.

अमर संस्थेतर्फे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आणि वैशाली पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता न ठेवता गरजूंसोबत वाटून घेण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *