पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करून वृक्षारोपण केले जाते. मात्र, लावलेली झाडे जगली नाहीत, तर या निधीचा उपयोग नेमका कशासाठी झाला, असा प्रश्न उपस्थित होतोय. यावल तालुक्यातील किनगाव-मालोद-वाघझिरा रस्त्यावरील वृक्षारोपणाच्या कामावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आता चौकशीची मागणी केली आहे.

यावल तालुक्यातील किनगाव-मालोद-वाघझिरा रस्त्याच्या दुतर्फा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने प्रत्यक्ष पाहणी केली असता, अंदाजे एक हजार झाडांपैकी केवळ शंभरच्या आसपास झाडे जिवंत असल्याचा दावा केला आहे. उर्वरित झाडांची झालेली दुरवस्था पाहता वृक्षारोपणासाठी खर्च झालेल्या शासकीय निधीच्या वापराबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम उपविभाग, यावल येथे उपविभागीय अधिकारी जहांगीर तडवी यांच्यासाठी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनातून आठ महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर माहिती मागविण्यात आली आहे. वृक्षारोपणासाठी मंजूर झालेला निधी, प्रत्यक्ष लावण्यात आलेल्या झाडांची संख्या, काम करणारा ठेकेदार किंवा संबंधित संस्था, कामाची अंदाजपत्रकीय किंमत, प्रत्यक्ष झालेला खर्च, झाडांच्या संगोपनासाठी केलेली तरतूद आणि देखभालीची जबाबदारी यांचा तपशील मागण्यात आला आहे.

केवळ कागदोपत्री वृक्षारोपण दाखवून शासकीय निधी खर्च झाल्याचे चित्र निर्माण केले गेले आहे का, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही मनविसेने केली आहे. संबंधित रस्त्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून मृत झालेल्या झाडांची संख्या, पाणीपुरवठा आणि देखभालीची व्यवस्था तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कामात आर्थिक अनियमितता, हलगर्जीपणा किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित ठेकेदार तसेच जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी भूमिका मनविसेने मांडली आहे.

जनतेच्या कररूपी पैशाचा हिशेब जनतेला मिळालाच पाहिजे!

वृक्षारोपणाचे फोटो काढून प्रसिद्धी मिळविणे म्हणजे पर्यावरण संवर्धन नव्हे, तर लावलेले प्रत्येक झाड जगविणे ही खरी जबाबदारी असल्याचे मनविसेने स्पष्ट केले आहे. प्रशासनाकडून समाधानकारक कार्यवाही न झाल्यास माहिती अधिकार अधिनियम तसेच इतर कायदेशीर मार्गांचा अवलंब करून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

सदर निवेदन विकास जंजाळे, वरिष्ठ लिपिक, सार्वजनिक बांधकाम विभाग, यावल यांनी स्वीकारले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, जिल्हा सचिव विष्णू कोळी, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हा सचिव अमोल पाटील, मनविसे तालुकाध्यक्ष गौरव सोनवणे, मनविसे तालुका संघटक चेतन पवार, तालुका उपाध्यक्ष नितीन कोळी तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *