जालना : विनाकारण आणि राजकीय खेळीतून निष्पाप आणि कर्तव्यदक्ष पोलीसांचे झालेले निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके यांनी जालना पोलीस अधिक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.शिवाय पोलीसांना सन्मानाने कर्तव्य बहाल करण्यात यावे.अन्यथा संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.निवेदनात म्हटले आहे की,हद्दीत गंभीर स्वरुपाचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.दोन गटांमध्ये जोरदार भांडण झाले होते या दोन्ही गटांना राजकीय पार्श्वभूमी यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट होवून सामाजिक शांतता बाधीत होवू नये म्हणून पोलीसांनी प्रसंगावधान राखून घेतलेली भूमिका कायदेशीर,योग्य व स्वागतार्ह आहे.दखलपात्र गुन्हा दाखल होण्याचे कायदेशीर कागदपत्राची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीसांनी कोणतीच हालचाल करु नये असे कायद्दयाला कुठेही अभीप्रेत नाही आणि तसे असेल तर मग कोणत्याही गंभीर गुन्हयाच्या प्रकरणात पोलीस यंत्रणा हालचाल करणार नाही व प्रकरण आणखी चिघळेल,केवळ एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयापर्यंत आरोपी शोधण्यासाठी आणि गंभीर स्वरुपाचे प्रकरण शांत करण्यासाठी पोलीस गेले म्हणून त्यांना निलंबीत करणे हे पोलीसांचे मनोबल खच्चीकरण करणारे आणि जनमाणसात विपरीत व नकारात्मक संदेश देणारे आहे.राष्ट्रीय पातळीवरील एका बडया पक्षाच्या कार्यालयापर्यंत ipc- ३०७ , ३२४,१४३ , १४७ , १४८,१४ ९ , २२७ , scc ४ पत्रकार संरक्षण कायदा यांसारख्या गंभीर गुन्हयातील आरोपींच्या शोधासाठी पोलीस पोहोचले तर त्या पक्षाने त्यांचे स्वागत करायला हवे आणि मोकळ्या मनाने कायदेशीर आणि सामाजिक बांधीलकी जपत पोलीसांना मदत करायला हवी होती.त्यात अपमानास्पद असणारी कोणती बाब आहे ? पोलीस तर तुम्हा – आम्हा सर्वांचे आबाल – वृध्द , नागरिक , महिला , पिडीत , यांचे संरक्षण करणारे आहेत.मग त्यांच्या येण्याने कमीपणा का वाटतो ? उलट त्यांच्या येण्याचे स्वागत करायला हवे.किंबहुना त्यांना सर्वोतपरी सहकार्य करायला हवं कारण ती आपली कायदेशीर जबाबदारी आणि कर्तव्यही आहे.वेळोवेळी केवळ आपण राजकीय विवादामध्ये आपल्या संरक्षण यंत्रणेला आणि पोलीसांना हतबल करणार असु,अपमानीत करणार असू तर येणारा भविष्यकाळ अतीशय वाईट असेल.महाराष्ट्रात सध्या पोलीस दलाला त्यांची बाजू मांडण्यासाठी योग्य भूमिका पटवून सांगण्यासाठी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अन्य सरकारी नोकरांसारखे संघटनेचे पाठबळ नाही.विधीमंडळात त्यांचा लोकप्रतिनीधी नाही,अथवा अन्य कोणत्याही लोकशाही मार्गाने विरोध दर्शविण्याचा पर्यायही उपलब्ध नाही.त्यामुळे तोंड दाबुन बुक्यांचा मार अशी त्यांची अवस्था होते – आणि अकारण होणारा अन्याय निपूटपणे सहन करावा लागतो.तरी या प्रकरणी पोलीसांनी बजावलेल्या कर्तव्याचे आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो.अकारण आणि राजकीय खेळीतून निष्पाप आणि कर्तव्यदक्ष पोलीसांचे झालेले निलंबन तात्काळ मागे घ्यावे.जे अयोग्य, अनावश्यक,अन्यायकारक आहे.सदरचे निलंबन तात्काळ मागे घेवून निलंबीत पोलीसांना त्यांच्या कर्तव्यावर सन्मानाने बहाल करावे.किंबहुना अशा गंभीर प्रसंगी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू दिला नाही,म्हणून त्यांचे कौतूक करावे.तरच जनमाणसांत पोलीसांविषयी विश्वास आपुलकी आणि आस्था राहील.तसेच पोलीस दलातही जनतेसाठी दायीत्व भावनेन कर्तव्य करण्याचा जज्बा आणि ध्येय टिकून राहील.या सर्व बाबींचा न्यायोक्त विचार करुन संबंधीत निलंबीत पोलीस बांधवांना त्यांचे निलंबन रद्द करुन,कर्तव्यावर बहाल करण्यात यावे अशी मागणी पोलीस अधिक्षकांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके यांनी केली आहे.अन्यथा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा ईशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे .