सांगली :- राहुल वाडकर
सांगली : वसंतदादा बँक घोट्याळ्या प्रकरणी ९ स्पटेंबर ला सुनवाईअवसायनातील वसंतदादा बँकेतील २४७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी २५ तत्कालीन संचालकांना त्यांच्या मालमत्तांवर बोजा चढविण्याबाबत बँकेने दिलेल्या अर्जावर सध्या सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी उलटतपास पुढील आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याची सुनावणी ९ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
बँकेचे चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्यामार्फत घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. २७ संचालक व दोन अधिकाऱ्यांच्या १०१ मालमत्तांवर बोजा चढविण्याबाबतचे आदेश यापूर्वी दिले होते. पुणे येथील न्यायाधिकरणाने ते आदेश अंशत: रद्द केले होते. दरम्यान, बँकेमार्फत मालमत्तेवर बोजा चढविण्याबाबत दिलेल्या अर्जावर संचालकांकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यातील अनेक संचालकांच्या वकिलांनी मागील काही सुनावणीत युक्तिवाद केला. सध्या बँकेच्या चाैकशीअंतर्गत उलट तपासाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गेल्या काही वर्षांपासून ठप्प असलेल्या अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या २४७ कोटींच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा गतीने सुरू झाली आहे. त्यामुळे घोटाळ्यातील माजी संचालक, अधिकारी यांची चिंता वाढली आहे. घोटाळ्याच्या आरोपपत्रात २७ माजी संचालक, तीन मृत माजी संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप नेत्यांचा समावेश आहे.