अहमदनगर :- आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्‍या 250 व्‍या जयंती निमित्‍त महिला सक्षमीकरणावर शालेय विद्यार्थ्‍यांची जनजागृती रॅलीचे जिल्‍हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आज आयोजन करण्‍यात आले होते. शहरातील करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्‍मारक (हुतात्‍मा स्‍मारक), लालटाकी रोड येथुन सकाळी 8 वाजता या रॅलीला सुरूवात झाली.
महानगरपालिकेचे आयुक्‍त डॉ. पंकज जावळे, जिल्‍हा कोषागार अधिकारी भाग्‍यश्री जाधव-भोसले यांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ करण्‍यात आला. यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर, अहमदनगर जिल्‍हा वाचनालयाचे उपाध्‍यक्ष दिलीप पांढरे, ज्‍योती कुलकर्णी, जिल्‍हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर उपस्थिती होते.
कार्यक्रमाच्‍या सुरूवातीला करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्यास व समाधीस पुष्‍पहार अर्पण करून, हुतात्‍मा स्‍मारकास मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुष्‍पचक्र अर्पण करण्‍यात आले. यानंतर उपस्थित मान्‍यवरांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करून रॅलीला शुभेच्‍छा दिल्‍या.
जनजागृती रॅली सोबतच ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्‍यात आले होते. रॅली व ग्रंथ दिंडी करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक (हुतात्‍मा स्‍मारक), नीलक्रांती चौक, सिध्‍दी बाग परिसर, बालिका आश्रम रोड, भुतकरवाडी, महालक्ष्‍मी उद्यान या मार्गे मार्गक्रमण करुन जिल्‍हा ग्रंथालय कार्यालय या ठिकाणी जिल्‍हा सुचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर यांच्‍या उपस्थितीत रॅलीचा समारोप झाला. यावेळी रॅलीत सहभागी विद्यार्थ्‍यांना ग्रंथ व प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले. या रॅलीमध्‍ये सीताराम सारडा विद्यालय, कै. माणिकताई करंदीकर हायस्कुल व जुनिअर कॉलेज, पेमराज सारडा महाविद्यालय, न्यू .आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, रेसिडेन्शीयल कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, महाराष्ट्र बटालियन एन. सी .सी अहमदनगर असे सर्व 250 च्‍या वर शालेय विद्यार्थी व त्‍यांचे शिक्षक सहभागी झाले होते.
भारत सरकारच्‍या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्‍ठान कोलकत्‍ता यांच्‍यावतीने शासकीय ग्रंथालयामार्फत महिला सक्षमीकरणावर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी तर सुत्रसंचालन प्रा. गणेश भगत यांनी केले. ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे यांनी आभार व्‍यक्‍त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *