पुणे : लोणीकंद पोलीस स्टेशन व मांजरी खुर्द येथील अण्णासाहेब मगर विद्यामंदीर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी सुरक्षा कायदा व सुव्यवस्था मार्गदर्शन संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गादर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या आदेशानुसार मांजरी खुर्द येथील अण्णासाहेब मगर विद्यालयात आज शुक्रवार दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजी विद्यार्थ्यांना सुरक्षितता बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले.
गुन्हे शोध पथक, लोणीकंद पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी बाळासाहेब सकाटे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सायबर क्राईम म्हणजे काय ? सायबर क्राईमबाबत काय माहिती असली पाहिजे ,आपला ई मेल सुरक्षित ठेवणे , अकौंट हॅक झाल्यास काय करावे? ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना काय काळजी घ्यावी, तंत्रज्ञानाचे फायदे अगणित आहेत पण तोटेदेखील आहेत. आपल्या हातून माहिती तंत्रज्ञानाचा वापर करताना चुका होवू नयेत असे सांगितले.
अधिक मार्गदर्शन करताना मुलांनी घरून शाळेत निघाल्यावर अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर बसू नये, काही खायला दिले तर आपण ते खाऊ नये,येता जाता मुलींची छेड कोण काढत असेल तर तर आपण याकडे दुर्लक्ष न करता विद्यालयातील शिक्षकांना किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा अशा वेळी पोलीस आपल्या रक्षणासाठी अवघ्या १० मिनिटांमध्ये हजर राहातील .जर समाजामध्ये कोणी अफवा पसरवत असेल आपण त्या अफवांवर विश्वास न ठेवता त्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील पोलीस स्टेशनशी संपर्क साधून याविषयी त्वरीत माहिती द्यावी .सायबर क्राईम आधुनिक काळातील एक जागतिक समस्या कशी बनली आहे ,ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थी व पालक यांनी काय काळजी घ्यावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन पोलीस अधिकारी बाळासाहेब सकाटे यांनी यावेळी केले.
पोलीस अंमलदार साईनाथ रोकडे, पत्रकार संरक्षण समिती पुणे अध्यक्ष नाथाभाऊ उंद्रे, मांजरी खुर्द गावचे पोलीस पाटील अंकुशराव उंद्रे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शांताराम उंद्रे, मुख्याध्यापक जगदीश ठाकरे, प्रा.भालेराव, प्रा. संक, प्रा.महामुनी, प्रा.सोनकांबळे, प्रा.ढमे, प्रा.सन्मुखे, सौ.लोंढेताई, सौ.खैरनारताई ,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. क्रिडाशिक्षक प्रा.चंद यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तसेच आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *