बनावट असलेल्या हॉस्पिटलवर छापा टाकून डॉक्टरला अटक

रिसोड तालूक्यातील आसेगाव पेन येथील घटना


वाशिम : रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथे असलेल्या बनावट डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा टाकून पोलिसांनी बनावट डॉक्टरला अटक केली आहे.पवन प्रदीप खानझोडे वय २९ असे बनावट डॉक्टरचे नाव असुन त्यास अटक करण्यात आली.आणि त्याच्याकडून रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत.या कारवाईनंतर रिसोड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आसेगाव पेन गावात बनावट डॉक्टर असल्याची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी 28 सप्टेंबर रोजी या बनावट डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा टाकला. छापा टाकला असता या बनावट डॉक्टरकडे मोठ्या प्रमाणात औषधसाठा होता. आणि इतर वस्तू जप्त केल्या. या बनावट डॉक्टरने त्याच्या रुग्णालयाबाहेर मोठा फलक आणि त्यावर बनावट पदव्या छापल्या होत्या. आणि त्याने आपले हॉस्पिटल खूप सजवले होते. कोणत्याही प्रकारची पदवी नसून, परवान्याशिवाय तो अनेक दिवस रुग्णालय चालवत होता. याशिवाय त्यांनी आपल्या नावासमोर डॉक्टरही लावले होते. त्यामुळे अनेक दिवसांपासून तो रुग्णांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे स्पष्ट झाले. ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.शि.शिल्पा सुरगडे, पो.कॉ.प्रदीप चव्हाण, पो.कॉ.महेश परमेश्वरे, प्रवीण ढवणे डॉ.जे.बी. उमाळे, डॉ.आर.पी. बेले, एन.विजय नाईकवाडे, पवार, एन, व्ही राठोड, पीए. नागलकर यांनी छापा टाकून ही कारवाई केली.रिसोड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामहरी परबत बेले यांच्या फिर्यादीवरून कलम ३३,३६ महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *