पुणे : ७ वर्षाच्या मुलीला वेळनदीपात्रात फेकून देवून वडिलांनीच मुलीची हत्या केल्याची घटना शिक्रापूर येथे घडली.
अपेक्षा युवराज सोळुंके वय -७ वर्षे रा.बजरंगवाडी शिक्रापूर असे हत्या झालेल्या मुलीचे नाव असून शिक्रापूर पोलीसांनी याप्रकरणी मुलीचे वडील युवराज सोळूंके याला अटक केली. शिरूर न्यायालयाने आरोपी युवराज सोळुंके याला ३ दिवसांची पोलीस कस्टडी दिली.
शिक्रापूर पोलीसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनूसार ,मुलीची आई राधिका यांनी मुलगी अपेक्षा सोळूंके ही संध्याकाळी सहा,साडेसहा वाजण्याच्या सुमारास हरविल्याची शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलीसांनी सी सी टी व्ही फुटेज चेक केले. मुलीचे वडील युवराज सोळूंके बजरंगवाडीवरून शिक्रापूर येथील चाकण चौकमार्गे बाजारमैदान ,बाजारमैदान ते तळेगाव ढमढेरे रस्ता असे दिसून आले.त्यामुळे संशय बळावल्याने मुलीचे वडिलांना शिक्रापूर पोलीसांनी ताब्यात घेतले. मुलीच्या वडिलांकडे याबाबत पोलीसांनी अधिक चौकशी केली असता मुलीच्या वडिलांनी मुलीची शारीरिकदृष्ट्या वाढ होत नव्हती. त्यामुळे मुलीला जिवंत वेळनदीपात्रातील पाण्यात टाकून दिल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली दिली.
शिक्रापूर पोलीसांनी आरोपी युवराज सोळूंके याला अटक केली असून शिरूर न्यायालयाने आरोपीला ३ दिवसांची पोलीस कस्टडी दिली असल्याचे शिक्रापूर पोलीसांनी सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आतकरे, पोलीस नाईक रोहिदास पारखे या घटनेचा तपास करीत आहेत.
दरम्यान वेळनदीपात्रात फेकून दिलेल्या मुलीचा अद्याप शोध लागलेला नसून शिक्रापूर पोलीसांचे शोधकार्य चालू आहे.
भीमानदीपात्रात,वेळनदीपात्रात मुलीचे प्रेत कोणाला आढळून आल्यास शिक्रापूर पोलीसांशी ०२१३७-२८६३३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्रापूर पोलीसांनी केले आहे.
