सांगली : घरगुती कारण व माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून बामणोली (ता. मिरज) येथे पतीने पत्नीच्या डोक्यात बांबूने मारहाण करून खून केला. ही घटना बुधवारी रात्री घडली. सुनंदा कुमार जाधव (वय 30, रा. सध्या दत्तनगर, बामणोली, मूळ गाव जुनोनी, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. कुमार भीमराव जाधव (वय 38, सध्या रा. दत्तनगर, बामणोली) संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बामणोली येथे संशयित कुमार जाधव हा गेल्या काही वर्षांपासून पत्नी, तीन मुलींसह भाड्याच्या खोलीत राहत आहे. जाधव हा कुपवाड येथे एका कारखान्यात हमाली करतो. त्याचा 2003 मध्ये तावशी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुनंदा हिच्याशी विवाह झाला होता. बुधवारी रात्री संशयित कुमार व पत्नी सुनंदा यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. याचा राग आल्याने पती कुमार याने पत्नी सुनंदा हिला घरातून फरफटत घराबाहेर आणले. तिच्या डोक्यात बांबूने मारहाण केली. या हल्ल्यात सुनंदा रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर घाबरलेल्या कुमार याने शेजारील एका रिक्षाचालकाला बोलावून पत्नीला उपचारासाठी सांगलीतील
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी त्याने डॉक्टरांना पत्नी फरशीवर पाय घसरून पडल्याने ती जखमी झाल्याचे सांगितले.
सुनंदा हिचा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच कुमार याने पत्नीला दवाखान्यात सोडून पळ काढला. डॉक्टरांनी या घटनेची माहिती कुपवाड पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील, हवालदार गजानन जाधव, संदीप पाटील, सतीश माने, महादेव नागणे यांनी तातडीने दवाखान्यात दाखल होऊन माहिती घेतली. फरारी कुमार याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला जेरबंद केले.