पुणे : सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना राष्ट्रपती शौर्य पदक मा. राज्यपाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.श्री नागनाथ पाटील हे मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण गावचे सुपुत्र असून सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावरती पुणे ग्रामीण इंदापूर पोलीस स्टेशन येथे गेले एक वर्ष पासून कार्यरत आहेत.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दामाजी कारखाना, माध्यमिक शिक्षण, श्री. विलासराव देशमुख प्रशाला, कारखाना, उच्च माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज मंगळवेढा इथून पूर्ण केले. तसेच स्वेरी कॉलेज, गोपाळपूर येथून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. अभियांत्रिकी पदवी प्राप्त झाल्यानंतर पुणे येथील भोसरी एमआयडीसीमध्ये नामांकित कंपनीत नोकरी मिळाली.
तसेच घरची परिस्थिती बेताची असल्याने दोन भाऊ ही शिक्षण घेत होते. आई वडील शेतकरी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती, त्यामुळे स्पर्धा परीक्षा करायची तीव्र इच्छाशक्ती असतानाही दुसऱ्या भावाला नोकरी मिळेल पर्यंत कंपनीमधील खाजगी नोकरी करावी लागेल अशी अट घरच्यांची होती.
लहानपणापासून आई-वडिलांसोबत कष्ट करत शिक्षण घेतलेले असल्याने नाराज न होता आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढून पुढे काही करून पुढे जायचे हे निश्चित असल्याने खाजगी कंपनीतील नोकरी करीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
सन २०१३ साली पीएसआय परीक्षेचा फॉर्म भरला आणि पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालो. त्यानंतर खाजगी कंपनीतील नोकरीचा राजीनामा देऊन संपूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेला देण्याचा निर्णय घेतला. PSI मुख्य परीक्षा मध्येही चांगले गुण मिळाले. शारीरिक चाचणी व मुलाखतीचे जोरदार तयारी करून अंतिम यादीमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली.
सदरच्या शैक्षिणिक प्रवासामध्ये आई वडील, भावंडाने , मामांनी व सर्व उचेठाण गावातील ग्रामस्थ यांनी पाठीशी उभारून खंबीरपणे साथ दिली.त्यानंतर २०१५ साली महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे ०१ वर्ष खडतर प्रशिक्षण घेतले. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथून पोलीस खात्यातील प्रथम नियुक्ती नक्षलप्रभावित, अतिदुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यात झाली. त्या ठिकाणी उप पोलीस स्टेशन डांमरचा येथे नेमणूक केली. उप पोलीस स्टेशन दामरंचा येथे एक वर्ष सेवा बजावल्यानंतर तत्कालीन गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.डॉ.अभिनव देशमुख सा. यांनी उप पोलीस स्टेशन,दामरंचा येथून विशेष अभियान पथक (सी-६०), प्राणहिता येथे बदली केली. विशेष अभियान पथक, प्राणहिता येथे कार्यरत असताना, तत्कालीन गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, मा.डॉ. अभिनव देशमुख सा.,मा. श्री शैलेश बलकवडे सा. व मा.श्री अंकित गोयल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानामध्ये नक्षलवाद्यां सोबत झालेल्या एकूण १० चकमकीमध्ये त्यांच्या सहकारी यांना सोबत घेऊन नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत , एकूण ०४ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात ,०८ नक्षलवाद्यांना अटक करण्यामध्ये,०२ नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यामध्ये यश आले. त्यांच्या या शौर्य पूर्ण कामगिरीबद्दल 26 जानेवारी 2021 रोजी माननीय राष्ट्रपती सा. यांच्याकडून राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल विरोधी अभियानामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी 14 डिसेंबर 2018 रोजी पोलीस उपनिरीक्षक ते सहाय्यक पोलीस निरीक्षक अशी वेगवर्दीत पदोन्नती दिली.
०१ मे २०२१ रोजी पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले. दिनांक 13 ऑक्टोंबर 2022 रोजी राजभवन मुंबई येथे माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे ग्रामीण , इंदापूर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावरती सेवा बजावत असून समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्याचा त्यांचा मानस आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे
