रायगड : भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने महाड पत्रकार संघाच्या वतीने तहसील कार्यालयात वर्तमानपत्र वाचनालय सुरु करण्यात आले. या उपक्रमामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना वाचनाचा आनंद घेता येणार आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने राबवलेल्या या उपक्रमाचे तहसीलदार सुरेश काशीद यांनी कौतुक केले.
शहरातील एकमेव नोंदणीकृत पत्रकार संघ असलेल्या महाड पत्रकार संघाच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने महाड तहसील कार्यालयात वर्तमानपत्र वाचनालय सुरु करण्यात आले. या वाचनालयाचे उद्घाटन तहसीलदार सुरेश काशीद यांच्या हस्ते झाले. यावेळी नायब तहसीलदार अरविंद घेमुड, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे, श्रीकांत सहस्रबुद्धे, गोपाल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अनंत कांबळे सर, आदी अधिकारी आणि पत्रकार संघाचे सभासद उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे आणि गोपाळ कांबळे, यांच्या हस्ते तहसीलदार काशीद यांना तहसील कार्यालयासाठी संविधानाची प्रत भेट देण्यात आली. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात महेश शिंदे यांनी महाड पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा घेवून महाड मध्ये यापुढे देखील सामाजिक कार्यात महाड पत्रकार संघ अग्रेसर राहून समाजाचा एक घटक म्हणून नेहमीच काम करेल असे सांगितले.
भारतीय राज्यघटना हि जगभरातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान अधिकार दिले. संविधान हा आपला सन्मान असून पत्रकार संघाने सुरु केलेला हा उपक्रम वाचन चळवळ पुढे नेण्यास नक्कीच मदत करणारा ठरणार आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्थंभ असलेल्या पत्रकारांची समाजाच्या विकासात महत्वाची भूमिका असल्याचे देखील तहसीलदार सुरेश काशीद यांनी सांगितले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार यांनी देखील संविधान दिनाच्या सर्वाना शुभेच्छा देत संविधानाची मुल्ये जपण्याचा आपण निर्धार केला पाहिजे असे सांगून आधुनिक युगात वाचनापासून दूर जाणाऱ्या भावी पिढीला वाचविण्यासाठी पुन्हा वाचनाकडे वळवणे याकरिता वर्तमानपत्र वाचन हि काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार संघाचे सचिव रोहित पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आणि वन विभागाचे राकेश साहू यांचे आभार व्यक्त केले. यावेळी महाड उपविभागीय कार्यालयाचे रवींद्र भोसले, निवडणूक शाखेचे भारत जाधव, वृषाली पवार आदी कर्मचारी तर पत्रकार संघाचे राजेंद्र जैतपाल, उदय सावंत,योगेश भामरे, निलेश लोखंडे, नितेश लोखंडे, गोपाळ कांबळे, उपस्थित होते.
महाड –नितेश लोखंडे