पुणे : नुकत्याच घेण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेत शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने यशाची उज्वल परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. यात मोठ्या गटातील वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी शामकांत माळी, शंभर मीटर धावण्याच्या मोठ्या मुलांच्या गटात सार्थक रमाकांत शिवले, लहान गटातील लांब उडी स्पर्धेत राजवीर किरण कामठे हे विद्यार्थी चमकले असून क्रीडाशिक्षक पोपटराव दरंदले यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. आजपर्यंतच्या शाळेच्या इतिहासात वाबळेवाडी शाळेचे हे अभूतपूर्व यश मानले जात असून तालुक्यात गुणवत्तेबरोबर कला क्रीडा स्पर्धेतही वाबळेवाडीने सरस कामगिरी केल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार यांनी दिली.
महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेत दैदीप्यमान यश संपादन केले असून शिरूर तालुक्यात वाबळेवाडीचा दबदबा कायम राखत शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यात मोठ्या गटातील वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी शामकांत माळी हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर शंभर मीटर धावण्याच्या मोठ्या मुलांच्या गटात सार्थक रमाकांत शिवले याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. लहान गटातील लांब उडी स्पर्धेत राजवीर किरण कामठे याने प्रथम क्रमांक मिळाला आहे. मोठ्या गटातील उंच उडी स्पर्धेत मुलींमध्ये पौर्णिमा दत्तात्रय मासळकर या मुलीचा द्वितीय क्रमांक, मोठ्या गटातील मुलांच्या खो खो स्पर्धेत वाबळेवाडीचा संघ उपविजेता ठरला असून शाळेने मिळवलेले हे आजपर्यंतचे अभूतपूर्व यश मानले जाते.
निकाल जाहीर होताच ज्या विद्यार्थ्यांची तालुका पातळीवर निवड झाली त्यांचा शाळेकडून मुख्याध्यापक विठ्ठल पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते. तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, प्रकाश विठ्ठल वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.वाबळेवाडी शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
