पुणे : जिल्ह्यात एका काकाने भाची विवस्त्र करून त्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भरारामध्ये हे कृत्य केल्याने खुद्द सख्ख्या मामा संतापला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी काकाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेली तालुक्यातील उरुळी कांचन परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मामाच्या मुलीसोबत भाच्याचे प्रेमसंबंध होते. या प्रकरणाला मामाचा तीव्र विरोध होता. मात्र मामाचा विरोध झिडकारून त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केले. त्याचा संताप मामाच्या मनात होता. त्यामुळे मामाने संपूर्ण राग हा मुलाच्या बहिणी म्हणजे आपल्या दोन्ही भाचींवर काढला. त्याने सख्ख्या भाचींना भररस्त्यात मारहाण केली. तसेच नराधम मामाने त्यांना विवस्त्र करत शिवीगाळही केली. तसेच त्याचे चित्रीकरणही केले. या प्रकाराने जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात असून मामावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. हा सर्व प्रकार हवेलीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर यांनी समोर आणला आहे. मामाने मारहाण केल्याचे देखील हेमलता बडेकर यांना पाठवलेल्या व्हिडिओत पळून गेलेल्या मुलाने सांगितले आहे. तसेच आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी त्याने केली असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बडेकर यांनी लोणी काळभोर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दखल केला आहे. सध्या याप्रकरणाचा तपास सुरु असून संबंधितांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे कोयता गँगमुळे दहशत निर्माण झाली असतानाच कौटुंबिक हिंसाचाराच्या अशा घटनांमुळे समाजातील वातावरण आणखी गढूळ होताना दिसत आहे.